(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

मृत्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.

  • परम सत्य मृत्यू*

मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.

वैद्यकीय दृष्टिकोन

’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात.

मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते.

हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत.

मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही.

धार्मिक दृष्टिकोन

माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात. याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक, त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे. अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात.

या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्‌भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्‌गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते.

मृत व्यक्तीचा ’जीव’ कायमचा कबरीमध्ये पडून राहतो, कायमचा कैलासावर, वैकुंठात, स्वर्गात, नरकात किंवा थोडाथोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो, भूत होऊन पृथ्वीवरच राहतो, परमेश्वराशी एकजीव होतो जातो, निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत. जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कबरीत हा पडून राहिलेल्या ’जिवा’चा न्यायनिवाडा करतो अशीही धार्मिक कल्पना आहे. याचा अर्थ असा की ’जिवाचे मृत्यूनंतर अस्तित्व’ अनेक धर्मांनी मान्य केले आहे. म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या ’जिवंत’ असतो.

आध्यात्मिक दृष्टिकोन

ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे, भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा नरकवास एवढीच मर्यादित असते. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे, हा या धर्मांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश (म्हणजे पाच आवरणे वा देह) असतात. या आवरणांना कोश म्हणतात. अन्‍नकोश, प्राणकोश, मनकोश (किंवा कार्मिककोश), विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत. तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसॉफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत.

अन्‍न्कोश आपण डोळ्याने पाहू शकतो, प्राणकोश, वासनाकोश आणि मनकोश यांची फक्त कल्पना करता येते. सामान्य माणसापाशी विज्ञानकोश, आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात. उच्च बुद्धि्मंत, कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशांचा थोडाफार विकास झालेला असतो. या पाच वा सात कोशांव्यतिरिक्त माणसाला एक कारण-देह असतो. मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते.

माणसाच्या मृत्यूच्या वेळी माणसाचा दृश्यकोश गळून पडतो आणि कालांतराने प्राण कोशही गळून पडतो. वासनाकोश आणि मनकोश यांचे सारस्वरूप कारण-देहाला बीजरूपाने चिकटून राहतात. माणसाच्या मृत्यूच्या वेळी क्त त्‍याचा फक्त स्थूलदेह मरण पावतो, शरीरातील जीवात्मा हा प्राण-वासना-मन या कोशांसकट शरीराबाहेर पडतो. प्राणकोश हा शरीराला एका चंदेरी नाडीने जोडलेला असतो. ही नाडी किंवा आयुष्याची दोरी जोपर्यंत बळकट असतेतोवर मनुष्य जिवंत असतो. मनुष्य मेल्यानंतर ही चंदेरी नाडी तुटली नाही, तर तो पुनर्जीवित होऊ शकतो.

मृत्यूविषयीचा हा आध्यात्मिक दृष्टिकोन भारतीय धर्मांनी थोड्याफार फरकांनी मान्य केलेला आहे.